Saturday, 29 May 2021

फक्त श्‍वासावर..विश्‍वास ठेवला..!

 


*फक्त श्‍वासावर..विश्‍वास ठेवला..!*

ता. १५ मे २०२१, गेल्या १९ दिवसापासून सुरू असलेली कोरोनाशी लढाई जिंकली. आज लग्नाचा वाढदिवसही मनात.पण अव्यक्तच. कारण माझे देवासमान असणारे सासरे कै. गोविंद खाशाबा आडके व आजी कै. कमल ज्ञानेदेव पाटोळे यांना कोरोनाच्या लढाई हार मानावी लागली.त्यांना देवाज्ञा झाली. या काळात पहाडासारख्या दु:खाना सामोरे जाव लागल. कोरोनामुळे सासरे हॉस्पिटलमध्ये त्यांच्या घरातील तीन जण पोझिटीव्ह , आज्जीकडचे पाचजण पोझिटीव्ह. त्यात माझा रिपोर्ट पोझिटीव्ह आल्याने मीही काळजीतच. जोपर्यंत घरच्यांचे रिपोर्ट आले नाहीत, तोपर्यंत मन स्थिर नव्हते. छोट्या दिदीला (आरोहीला ) खोकला तर शंभूला सर्दी म्हणून जास्त टेन्शन आलं होतं. पत्नी व  बंधूला साधा खोकला होता. पण सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने अंगात जीव आला. तरीही मन रहावत नव्हतं, त्यात पुन्हा सहचारिणीला ताप , दिदीला खोकला. म्हणून खासगीत पुन्हा रक्त तपासणी करून घेतली आणि रिपोर्ट निगेटीव्ह. खर तर मला कोणतीही रिस्क नको होती. तशी मला लक्षण जाणवलं की मी खूप काळजी घेतली, मी एक दिवस स्वतंत्र राहण पसंद केल होत. म्हणून सगळेजण सुरक्षित.

मला, लस घेतल्यानंतर अंगदुखी व ताप आला तशीच काहीशी लक्षणे जाणवली. त्यात अगोदरच्या दिवशी मोठे दगड चार फुट उंचीच्या तारेच्या कुंपणाबाहेर उचलून टाकल होते.त्यामुळे साधी कणकणी होतीच. मात्र तरीही फॅमिली डॉ. मकरंद तोरो यांच्याकडे त्याच दिवशी जाऊन हकीकत सांगितली. त्यांच्या सल्ल्यानुसार कोरोना प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन टेस्ट केली आणि पोझिटीव्ह असल्याच कळलं. क्षणभर गरगरल्या सारख झालं, पण वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशिल तुरूकमाने यांनी धीर दिला.सर, घाबरू नका , पाच दिवसाच्या गोळ्या घेऊन जा.व्हाल बरे लवकर. हे त्यांचे शब्द खूप आधार देऊन गेले. आणि सुरू झाले होम आयसोलेशन. व्यायाम म्हणजे फक्त प्राणायाम, वाफारा, शेक, नाष्टा, जेवण ,काढे, गोळ्यांचा खुराक हे शरीराला , मनाला घरच्यांची अमृतवाणी. एक-एक शब्द पाठीवर थाप देऊन बळ देणारा. आई-तात्या, 'भिऊ नकोस अंकुशा',  लहू,"दादा घाबरू नको", पत्नी, 'बापाची सावली गेलीय आधीच, तुम्ही खचून जाऊ नका. तुम्हाला काय झालं तर काय करायचं. हाताच्य मुठी आवळून सगळकाही शांत होवून स्वत:लाच धिर देत होतो. त्यातच आली ती काळरात्र, पप्पा (सासरे) सिरीयस,आयसीयूतून व्हेंटिलेटरवर. मुकुल सार फोन करून कळवत होता, दाजी व्हेंटिलेटरवर घेतलय, अवघड आहे, शॉक आणि बरच काही.... नो वर्डस. 

रात्रीचा एक वाजलेला , झोप तर नाहीच, हाताच्या मुठी आवळत मोबाईलवर, हा, हो एवढंच बोलत होतो.आणि ...आपला देव हरवला. बायकोला तरी कसं बोलायचं, पण तीन ओळखले,चेहऱ्यावरचे भाव. न काही बोलता ती एवढंच बोलली, माझ्या मनाने स्वीकारले आहे. जे झालं ते, ,तुम्ही बरे व्हा. किती धाडस, किती आत्मक्लेश, किती दुःख. एका क्षणात बाजूला केलं. मनातून तिला सॅल्युट करत. धन्य तू नारी. आणि दबक्या आवाजात बोलली, काय देऊ नाष्टा आज..? मी म्हटलं दे काहीतरी. तीच हे बोलणं , दुःखाचे घाव सोसणे पाहून मला दहा हत्तीचं बळ आलं. आणि काढत राहिलो एक-एक रात्र-दिवस. त्यातच दोन-तीन दिवस ठसक्याने जीव नकोसा केला. नाही म्हणत,म्हणत फॅमिली डॉक्टरांचा कावा खावून HRCT केली. स्कोर ९ वर. आतातर पत्नी बंधू लहूला खूप टेन्शन. नक्की काय कराव. स्कोर तसा जास्त आहे. मी विचारल किती स्कोर ? बोलले तीन. पण त्यांच मनातून काळजीचे ढग वाहतच होते. तीन-चार डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर मला सायंकाळी हकीकत सांगितली. स्कोर ९ आहे. मनात भिती होतीच. पण माझ्या मम्मीचा (सासू) स्कोर दहा होता, पण त्या घरीच. म्हणून मला मोठा आधार होता. आणि बघता-बघता हळू कोरोनावर मात केली. अजून काही बरच काही घडल हेही काळात.. 

  कोरोनाच्या काळात खूप मित्र, सहकारी, आप्तेष्ट, पत्रकार बंधूनी फोन केले, मात्र मी उचलले नाहीत. त्याबद्दल मी जाहीर माफी असावी. या काळात फेसबुक व व्हाट्स अॅपपासून मला सावधगिरी बाळगायची होती. कारण कोणत्याही नकारात्मक गोष्टीला मला थारा द्यायचा नव्हता. या काळात माझी सहचारिणी सौ. गीता व बंधू लहुकुमार यांनी खूप साथ दिली. पत्नी: स्वतःचे वडील कोरोनात गेले असताना आणि स्वतःची आई, भाऊ व बहीण कोरोनाबाधित असताना तीचा धीर मला ऑक्सिजनसारखाच होता. मला आलेल्या खोकल्याच्या ठसक्यामुळे रात्रभर न झोपणारा लहान भाऊ यांनी प्रत्येकवेळी माझ्यातील नको असलेला कार्बन डाय-ऑक्साइड काढून टाकत होता.याकाळात एकच गोष्ट शिकायला मिळाली. मन है विश्वास , जर मनात इच्छाशक्ती शक्ती असेल तर कोणी तुम्हाला हरवू शकत नाही. भले तो आजार असो की तुमचं ध्येय. तब्बल १९ दिवसानंतर पिल जवळ आली. छोटी सहा वर्षाची आरोही डोळ्यातून पाणी गाळून रडली, पप्पा म्हणून तिन हंबरडा फोडला. तीचा हंबरडा न पाहवणारा होता. तीचा तो हंबरडा मनात घर करून गेला. तिच्या रडण्याने माझं मन विरघळून गेले. तिच्या गालावरून वाहणारे अश्रू पुसत मी सावरलो. तिच्या इवलाश्‍या हातांनी माझे अश्रू पुसले. बोलली पप्पा, तुम्ही बर झालाय आता. वय अवघ सहा वर्षे, किती समजूतदारपणा तिचा. एकमेकांचे डोळे पुसत सावरलो आणि घरात पुन्हा वावरू लागलो.

कोरोनाच्या लढाईत डॉ.सुशीलकुमार तुरुकमाने, डॉ.मकरंद तोरो, डॉ.दत्तात्रय तांबवेकर यांनी जो सलाईन सारखा आत्मविश्वास दिला. यासह चेअरमन सुरेंद्रदादा गुदगे यांनी वैयक्तिक फोन करुन आर्युवेदाचे डोस पाजले. सकाळ संपादक राजेश सोळसकर ,मॅनेजर राजेश निंबाळकर यासह अनेक मित्रांनी आधार-धीर दिला.त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी आहे. 

*ही गोष्ट माझी प्रेरणा*

कोरोनात , कॉलेजला असताना मला गोष्ट आठवली. एका वैज्ञानिक प्रयोगात एका व्यक्तीचे डोळ्यावर काळी पट्टी लावून डोळे बंद करतात. नंतर त्याला बोलतात, तुला आता आम्ही तुला सर्पदंश करणार आहोत. त्यामुळे तो व्यक्ती भीतीने हबकतो. थोड्यावेळाने त्याच्या शरीरावर टाचणी टोचतात. तरीही तो व्यक्ती मरून जातो. कारण निगेटीव्ह विचाराने त्याच्या शरीरात विष झाल होतं. केवळ भीतीपोटी तो मरण पावला. या गोष्टीतील सत्यता, संशोधक मला माहित नाही. पण त्यातून मिळालेला आत्मविश्‍वास हा खूप कामी आला. कोरोनाकाळात अगदी तसच झालं होतं. लोक केवळ भीतीने मृत्यूला आमंत्रण देतात. माझा स्कोर मला समजल्यावर मन शांत केलं. मनात एक विश्वास निर्माण केला. मी घरीच बरा होणार. एखाद्या संघाने वर्ल्ड कप जिंकावा , तसा मी we can do it आणि  मन है विश्वास..! अस म्हणत पोझिटीव्ह राहिलो आणि कोरोनाला निगेटिव्ह केलं.

*फाजील आत्मविश्वास बाळगू नका..!*

कोरोनात सगळ्यात नडतो, तो फाजील आत्मविश्वास. नसेल तस काही, खोकला तर आहे, नुसता ताप- त्यानं काय होतंय. अंग दुखतंय. हो..पण मी काल जास्त काम केलंय. म्हणून हे सर्व अंदाज कधीही फाजील ठरू शकतात. लक्षण जाणवली की डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही पहिल्याच टप्प्यात , तुम्ही घरी बरे होऊ शकता. अंदाज बांधण्यात तुम्ही वेळ घालवला की परिस्थिती बदलते. धोकाही वाढतो. वेळीच उपचार 


हाच रामबाण उपाय. 

*ताप आणि शरीराच गणित ..!*

कोरोनात तुमच्या शरीराचे तापमान किती? यालाही खूप महत्त्व असते. ते जास्त असेल तर नक्की कारण समजून घ्या. तुम्ही जास्त विचार केला की तुमचं शारीरिक तापमान वाढत ते टेन्शनमूळ. दुसरं म्हणजे तुम्ही तापमान चेक करताना तुम्ही कुठे आहात ? जर पत्र्याच्या घरात की स्लॅबमध्ये. पुरेशी खेळती हवा आहे का? याचाही विचार करायला हवा. कारण हवा खेळती नसेल तर तुमचा ताप हा जास्त वाटतो. उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी पत्र्याच्या घरात हवा खेळती नसेल तर,  तुमचं तापमान जास्त दिसून येत. त्यामुळे सभोवतालच वातावरण कस आहे.

*डक इटिंग करा....!*

कोरोनात तुम्हाला चव नसल्याने आपण काय खातोय. हेच कळत नाही. अगदी माती खाल्यासारखी जिभेला चव. वास तर नाही नाकाला. पण भरपूर जेवण हा नियम . तोंडात घेतलेला घास चावून बारीक केल्यानंतर तो पोटात ढकलायला तोंडात लाळ नसायची. जिभेत जीव नसल्यासारख वाटायच.पण जेवण कमी करायच नाही.हा नियमच. म्हणून घास पोटात ढकलताना, तोंडात घोटभर पाणी घ्यायच आणि बगळ्या-बदकासारखं तोंड वर करुन गिळून टाकायचं. घश्‍यात, पोटातून शेतातून चेंबरला पाणी वरती उकळ्या मारल्यागत व्हायच. पण नो उलटी.. जाग्यावर पटली. तो घास तसाच आत ढकलत. झगडलो आणि जिंकलो...! एक एक दिवस काढत आज एक महिनानंतर पुन्हा सज्ज 

झालो.नव्या लढाईसाठी.....!   

-अंकुश चव्हाण, सकाळ पत्रकार, मायणी


1 comment:

  1. बेस्ट अंकुश. अजून तुला बर्याच लढाया जिंकायच्या आहेत. मित्रा तुझ्या सारख्यांची समाजाला गरज आहे. अभिनंदन.

    ReplyDelete

doctersofmayani@ankush

 मायणी पत्रकार संघ,मायणी व छ.शिवाजी एज्यकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मायणीतील  डॅाक्टरांचा सत्कार सोहळा